
उपोषणाचा चौथा दिवस – सुशिल बेलेचा उपचाराला नकार, लढा सुरूच..

वरुड तालुका व नगर परिषद हद्दीतील प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी दाखल झाले.या दरम्यान उपोषणकर्ते सुशिल बेले व अविनाश बिसांद्रे यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी उपचाराची शिफारस केली असली तरी सुशिल बेले यांनी उपचार घेण्यास ठाम नकार दिला आणि “लढा सुरूच राहील” असा निर्धार व्यक्त केला. अविनाश बिसांद्रे यांना मात्र ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
अद्यापपर्यंत संबंधित अधिकारी उपोषणस्थळी दाखल झालेले नाहीत. या निष्क्रियतेमुळे जनतेत तीव्र संताप पसरला असून अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तहसील कार्यालयात झेप घेऊन गेले व प्रशासनाविरोधात उद्रेक व्यक्त केला.

यावेळी क्रांती ज्योती ब्रिगेडचे अध्यक्ष नंदेशजी अबाडकर (अमरावती) यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन ठाम पाठिंबा जाहीर केला.परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र जनतेच्या मागण्या तत्काळ मान्य करून ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.



